पुणे : वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल. असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला.
मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुणे मेट्रोचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्पामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बहुतांश सुटली आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे कामही 70 टक्के पेक्षा अधिक झालेले आहे. वडगाव शेरी च्या विविध भागात पीपीपी तत्त्वावर रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गोल्फ चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खराडी ते शिरूर उड्डाणपूल निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण आणि पार्किंग ची सुविधा उपलब्ध होत आहे. मी आमदार असताना प्रस्तावित केलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आता अंतिम टप्प्यात आहे. खराडीत पंतप्रधान आवास योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे या भीतीतून त्यांनी लाक्षणिक उपोषणाची स्टंटबाजी केली आहे अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे.