पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) गैरव्यवहारातील मुख्य संशयित सुनील झंवर याला उच्च न्यायालयाने १८ मार्चपर्यंत दिलासा दिल्यानंतर तो पुण्यातील न्यायालयात हजर झाला आहे. विशेष न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. ते वॉरंट रद्द करुन घेण्यासाठी सुनील झंवर न्यायालयात हजर झाला होता. त्याचबरोबर या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे यानेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
बीएचआरप्रकरणात पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर यांना न्यायालयाकडून फरार घोषित केले होते. तशी नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात आली होती. त्यानंतर सुनील झंवर याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सुनील झंवर यांना १८ मार्चपर्यंत अटक करण्यात येऊ नये, तोपर्यंत झंवर याने पुणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा, असा आदेश दिला होता. त्यानंतर शुक्रवार सुनील झंवर हा पुण्यातील विशेष न्यायालयात हजर झाला. न्यायालयाने फरार घोषित केलेले वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. सुनील झंवर याने अद्याप अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नसल्याचे सांगण्यात आले.
बीएचआरमधील फरार आरोपींच्या शोधात पोलीस असताना जितेंद्र कंडारे याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर येत्या १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.