पुणे : महाराष्ट्राला समृध्द संतपरंपरा लाभली आहे. विविध काव्यप्रकारांमधून संतांनी समाजप्रबोधनाचे संचित बहाल केले. हेच संचित सुनिता आचार्य या ५७ वर्षीय आजींनी रेशीम धाग्यांमधून चिरंजीव ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पांढ-या कापडावर रेशमाच्या धाग्यांनी त्यांनी स्तोत्रे, ओव्या लिहून ठेवण्याचा छंद आपलासा केला आहे.सुनिता आचार्य यांना लहानपणापासून संताच्या कार्याबद्दल नितांत आदर आणि देवाबद्दल कमालीची श्रध्दा आहे. संतांचा वारसा, त्यांची शब्दसंपदा लिखित स्वरुपात संवर्धित व्हावी, अशी त्यांनी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. २००९ सालापासून ही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचे त्यांनी ठरवले. पाच कडव्यांच्या गुरुस्तोत्रापासून रेशमाच्या धाग्याने कापडावर स्तोत्र विणण्याचा संकल्प त्यांनी सोडला. सुरुवातीला पांढ-या कापडावर चारही बाजूंनी समान जागा सोडून, खडूने अक्षरे रेखाटून घेतली जातात. अक्षरांचा आकार, ठेवण समान आल्याची खात्री झाल्यावर मार्करने ती अक्षरे गिरवून त्यावर रेशीम धाग्यांची त्या वीण घालतात. सुरुवातीला आचार्य यांनी वेदिका मिराशी यांच्याकडून त्यांनी स्तोत्रातील अक्षरे लिहून घेतली. तुकाराम गाथेतले अभंगही गिरवून घेतले. कालांतराने मैत्रिणीला हे काम जमेनासे झाले. आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना सतावर होता. त्यावेळी आचार्य यांच्या वडिलांनी सखाराम फरकाळे यांच्याशी ओळख करुन दिली. फरकाळे यांच्याकडून त्या अक्षरे लिहून, गिरवून घेतात आणि त्याच्यावर कोणत्या रंगाचे धागे शोभून दिसतील, त्याचा अंदाज घेऊन वीण घालायला सुरुवात करतात.सुनिता आचार्य यांनी आजपर्यंत आंबेजोगाईच्या दासोपंतांची पासोडी, गुलाब महाराज यांचा मोक्षपट, श्री गजानन स्तोत्र, संत रामदासांचे दासबोध, विष्णूसहस्त्रनाम आदी स्तोत्रे रेशीम धाग्यांचा वापर करुन पांढ-या बेडशीटवर विणली आहेत. सुशोभीकरणासाठी छोट्या छोट्या वस्तू कामी येतात. सध्या त्या भगवदगीतेचे अध्याय विणण्याचे काम करत आहेत. पहिल्या अध्यायातील तेराव्या ओवीपर्यंत काम झाले असून, संपूर्ण भगवदगीता पूर्ण करण्यासाठी दोन-अडीच वर्षे लागतील, असे सुनिता आचार्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सुनिता ज्ञानेश्वरीतील सर्व ओव्या विणण्याचे कामही हाती घेणार आहेत. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही टिळकांची सिंहगर्जना कापडावर विणून त्यांनी लोकमान्य टिळक संग्रहालयाला भेट दिली आहे. त्यांना या कामात त्यांची आई मालती आचार्य मदत करतात. माझी आणि आईची ग्रंथांवर श्रध्दा आहेच; मात्र, संतांबद्दल जास्त आपुलकी आहे, अशा भावना व्यक्त केल्या. पाणी पडले तरी ही वीण खराब होत नाही, असेही त्यांनी सांगितले.
सुनिता आचार्य : रेशमाच्या धाग्यांनी स्तोत्रे कापडावर विणण्यास खूप वेळ लागतो, असे काही जण म्हणतात. आपण टिंगलटवाळी करण्यात, चित्रपट पाहण्यात कितीतरी वेळ वाया घालवतो. संतांनी दिलेला वारसा टिकवून ठेवण्यात वेळ सत्कारणी लावण्यात मला समाधान मिळते. पुढील पिढ्यांसाठी हा वारसा चिरंजीवी ठरणार आहे.