लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पालिकेच्या उपमहापौरपदावरून भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं-आठवले गट) यांच्यात रंगलेल्या नाराजीनाट्यावर अखेर पडदा पडला असून हे पद ‘रिपाइं’कडे देण्यात आले आहे. महापौर बदलांनातर ‘रिपाइं’कडील हे पद भाजपने स्वतःकडे घेतले होते. एक वर्षानंतर पुन्हा ‘रिपाइं’चे त्यावर अधिकार सांगायला सुरुवात केली. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेला हा तिढा सोमवारी रात्री उशिरा सुटला. उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी मंगळवारी (दि.१६) राजीनामा दिला असून हे पद ‘रिपाइं’ला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालिकेत भाजप-रिपाइंची सत्ता आल्यांनातर अडीच वर्षे रिपाइंकडे उपमहापौरपद होते. हे पद भाजपने काढून घेतल्याने रिपाइं पदाधिकाऱ्यांचा आणि भाजप नेत्यांचा वाद झाला होता. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढील वर्षी रिपाइंला पुन्हा पद देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तत्कालीन भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी हे पद एक वर्षासाठीच असून पुढील वर्षी पुन्हा रिपाइंला संधी देणार असल्याचे सांगितले होते.
उपमहापौरपद मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रिपाइंमध्ये अल्पसंख्याकविरुद्ध अन्य असा वाद उफाळून आला होता. या पदासाठी गटनेत्या सुनीता वाडेकर आणि नगरसेविका फरजाना शेख यांनी इच्छुक होत्या. वारंवार काही ठराविक लोकांनाच पदे मिळत असल्याचा आरोप करीत शेख नाराज झाल्या होत्या. हा वाद थेट पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोचला होता.
आठवले यांच्या आदेशानुसार, शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक यांची संयुक्त बैठकीमध्ये सर्वानुमते वाडेकर यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. वाडेकर यांच्या नावाचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नवनियुक्त सभागृह नेते गणेश बिडकर यांना पाठविण्यात आले. परंतु, त्यावर गेल्या तीन महिन्यांत निर्णय झाला नव्हता. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षाची नाराजी टाळण्याकरिता भाजपने शेंडगे यांचा राजीनामा घेतला आहे.