बारामती/सुपे (पुणे) : मोरगाव हे अष्टविनायक गणपतीचे प्रथम स्थान म्हणून ओळखले जाते. मात्र, बुधवारी झालेल्या घटनेने मोरगाव पुरते हादरून गेले आहे. वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या अभिजित पोटे (वय २६) या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याची कोयत्याने १६ वार करून हत्या केल्याची घटना घडली. अभिजित पोटे यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पोटे यास गुरुवारी (दि २५) बारामतीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पाेलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.
मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षांपूर्वी २९ ऑगस्ट २०१३ रोजी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेली दहा वर्षांपासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी उपभोगून त्या बुधवारी (दि. २४) मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या. हजर झालेल्याच दिवशी त्यांचा किरकोळ कारणास्तव बळी गेला.
रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदविण्यात आला. बारामती येथील ऊर्जा भवन येथे शोकसभा घेत रिंकू बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आरोपी अभिजित पोटे याचे वडील ट्रक चालक आहेत. तर, आजी धुण्या-भांडीचे काम करते. त्याची आई गृहिणी आहे. तसेच, अभिजित याचे शिक्षण दहावी झाले आहे. तोदेखील घरीच असतो. तो एकलकोंड्या स्वभावाचा होता. सहसा तो कोण्यात मिसळत नसे, अशी परिसरात चर्चा आहे.
जानेवारीत पोटे याच्या घराचे वीजबिल ३२० रुपये आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, उन्हाळ्यात पंखा आदींचा वापर वाढल्याने ते बिल काही रकमेने वाढल्याची शक्यता आहे. त्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. चालू एप्रिल २०२४ या महिन्याचे ६३ युनिट वीज वापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्यांचा वापर तपासला असता तो ४० ते ७० युनिटमध्ये आहे. थकबाकी नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनिटने वाढला व त्याचे बिल ५७० आले होते. हे बिल वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच, सदर ग्राहकाची वीज बिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाइन तक्रार नोंदवलेली नाही. अवघ्या काही पैशांसाठी रिंकू बनसोडे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांची दोन मुले आईविना पोरकी झाली आहेत. यातील एक बाळ अवघ्या एक वर्षांचे असल्याची माहिती मिळत आहे.