पुणे : पुणेरी पाट्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या पाट्यांवरच्या मजकूरासाठी पुणेकर प्रसिद्ध आहेतच पण या पाटीपुराणात नव्या प्रसंगाची भर पडली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबाहेर लावलेल्या पाटीवरचा अशुद्ध मजकूर बघून सोशल मीडियावर विद्यार्थ्याने पोस्ट करताच त्यावर संबंधित नगरसेवकाने तात्काळ दखल घेऊन अवघ्या तासात त्याजागी नवी आणून लावली आहे. या प्रकराने संबंधित विद्यार्थीही आश्चर्यचकित झाला असून त्याने नवीन पोस्ट करून नगरसेवकाचे आभार मानले आहेत.
शहरात असणाऱ्या सार्वजनिक वास्तू, सोसायट्या यांच्या नावाच्या पाट्या लावल्या जातात. त्यापाटीखाली ज्या नगरसेवकाच्या निधीतून पाटी लावतात त्या लोकप्रतिनिधींचे नावही टाकले जाते. याच नियमाला अनुसरून नगरसेवक आदित्य माळवे यांनी विद्यापीठाबाहेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि त्याच्याखाली विद्यापीठाच्या दिशेने बाण दाखवला होता. मात्र या पाटीवर शुद्धलेखनाच्या चुका होत्या. अखेर मराठी विभागात एम फील करणाऱ्या भागवत देशमुख या विद्यार्थ्याने हा फोटो स्वतःच्या फेसबुकवर पोस्ट केला. त्यानंतर काही तासात स्थानिक नगरसेवक माळवे यांनी दखल घेत अशुद्ध मजकुराची पाटी हटवत नवी पाटी लावली. खुद्द देशमुखही त्यामुळे आश्चर्यात पडले असून त्यांनी फेसबुकवरच माळवे यांचे आभार मानले आहेत. याबाबत देशमुख यांनी लोकमतशी बोलताना 'अशुद्ध पाटी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ असणे पटत नव्हते, त्यामुळे ही पोस्ट केली होती. त्याचा एवढ्या लवकर परिणाम होईल असे वाटले नव्हते. पण झालेल्या घटनेमुळे पाटी बदलल्याचे समाधान आहे' असे सांगितले. नगरसेवक माळवे यांनी नजरचुकीने अशुद्ध लेखन झाले असल्याचे मान्य केले. मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर लगेच हालचाल करत पाटी बदलल्याचे स्पष्ट केले.नागरी प्रश्नांसाठी अनेकदा ढिम्म असणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या या वेगवान हालचालीबद्दलची चर्चा पुणे शहरात रंगलेली आहे.