पुणे : जिल्ह्यामध्ये सुरू असलेला प्रचाराची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचली आहे. अवघा एक दिवस हातात उरल्याने अगदी सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यक्तिगत गाठीभेटी, पदयात्रा, प्रचार रॅली यांचे विविध पक्षांनी उत्साहात गावागावात आणि तालुक्यांत आयोजन केले आहे. त्याशिवाय त्या त्या तालुक्यातील मुख्य नेत्यांच्या सभांनी प्रचाराची सांगता होणार आहे. काही ठिकाणी स्टार प्रचारक आणून गर्दी खेचून प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यामध्ये नुसता प्रचाराचा धुरळा उडत आहे. केंद्रातील व राज्यातील मोठ्या नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवलेली असली तरी स्थानिक नेत्यांनी मात्र त्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये आपले वर्चस्व राखण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्याच्या दिवसाचा मिनीट अन मिनीट सार्थकी लावून अधिकाधीक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे. प्रचार रॅल्यांद्वारे सारे गट-गण पिंजून काढले जाणार आहेत. प्रचाराच्या रिक्षांचा वेळ वाढवला असून सर्व ठिकाणी या रिक्षा व डिजीटल रथ दिवसभर फिरत राहणार आहेत. (प्रतिनिधी)सांगतो ना, बटन कुठलं दाबायचं?उद्या दिवसभर विविध पक्षांचे कार्यकर्ते ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना नेमकं कुठलं बटन दाबायचं या विषयी ‘प्रबोधन’ करीत फिरणार आहेत.बहुतांश कार्यकर्ते याच कामामध्ये व्यस्त असणार आहेत. प्रत्येक गट आणि गणामध्ये कोणापुढचे बटन दाबायचे याचाच आग्रह डमी मशीन घेऊन केला जाणार आहे.शिवजयंती निमित्ताने शक्तिप्रदर्शन बारामती : तालुक्यामध्ये आजचा दिवस विविध नेत्यांच्या सभांनी गाजला. त्यामध्ये महादेव जानकर, राम शिंदे, खा. सुप्रिया सुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सभा प्रामुख्याने झाल्या. उद्या शिवजयंती असल्याने मोठ्या नेत्यांच्या सभा बारामतीमध्ये आयोजित केलेल्या नाहीत. उलट या दिवसाचे औचित्य साधून विविध पक्षांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणुकांचे आयोजन केले आहे. प्रत्यक्ष गाठीभेटींवर उद्या भर राहणार असून विविध पक्षांचे उमेदवार रॅली काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. दिवसभर रणधुमाळी!आंबेगाव : तालुक्यामध्ये दिवसभर प्रचाराच्या रॅलीवर भर राहणार असल्याचे पक्षनेत्यांनी सांगितले. तिथे आमदार दिलीप वळसे पाटील यांची मंचरमध्ये शेवटची सभा होणार असून त्यानंतर प्रचाराची सांगता होणार आहे. त्याच जागी सायंकाळी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची सांगतेची सभा होणार आहे. त्यामुळे मंचरमधील संपूर्ण वातावरण दिवसभर राजकीय राहणार आहे. प्रचारासाठी स्टार प्रचारकखेड : तालुक्यामध्ये स्टार प्रचारक आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये जय मल्हार फेम देवदत्त नागे व बानू फेम इशा केसकर यांची दुपारच्या वेळी उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय स्थानिक नेते व आमदार दिवसभर त्यांचे गट पिंजून काढणार आहेत. कुरुळी व नाणेकरवाडी येथे सभा होणार आहेत. राष्ट्रवादी व शिवसेना यांचा व्यक्तिगत संपर्क व प्रचार रॅलीवर भर राहणार आहे. व्यक्तिगत गाठीभेटीपुरंदर : तालुक्यात प्रत्येक गणात शिवसेनेची सभा घेतली जाणार आहे. बाकी व्यक्तिगत गाठीभेटीवर भर राहणार आहे. आमदार विजय शिवतारे यांच्या सभेचे नियोजन केले जात आहे. त्या पलिकडे कोणत्याही मोठ्या नेत्याची उद्या पुरंदर तालुक्यामध्ये सभा नियोजित केलेली नाही. स्थानिक सभांतून सांगताजुन्नर : तालुक्यात प्रामुख्याने व्यक्तिगत संपर्कासह स्थानिक सभांवर भर असणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर सभांद्वारे प्रचाराची सांगता करण्याचे नियोजन केलेले आहे.
जिल्ह्यात प्रचाराचा सुपर संडे!
By admin | Published: February 19, 2017 4:34 AM