पुणे : पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षकपदी बदली हाेणे हे बक्षीस मिळाल्यासारखे असले तरी येथे काम करणे आव्हानात्मक आहे. ग्रामीण दलात संसाधनांची कमतरता असून येथे ज्या प्रकारची राजकीय आव्हाने आहेत तसेच गुन्हेगारीचे स्वरूप आहे त्याला ताेंड देणे कठीण असल्याचे नवनियुक्त पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी सांगितले.
पाषाण रस्त्यावरील पुणे पाेलीस अधीक्षक कार्यालयातील भीमाशंकर सभागृहात डाॅ. अभिनव देशमुख यांच्या निराेप समारंभाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी अप्पर पाेलीस अधीक्षक मितेश घट्टे, बारामती उपविभागीय कार्यालयाचे अपर पाेलीस अधीक्षक मिलिंद माेहिते यांच्यासह जिल्ह्यांतील विविध पाेलीस ठाण्यांचे पाेलीस निरीक्षक आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. तत्पूर्वी, नवनियुक्त पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी डाॅ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पाेलीस दलाचा पदभार स्वीकारला.
गाेयल म्हणाले, आज देशमुख यांच्या हस्ते पदभार स्वीकारताेय हे मी माझे भाग्य समजताे. पुणे जिल्ह्यात काम करताना काेणती आव्हाने आहेत, याबाबत तीन ते चार तास बैठक घेत सरांनी मला माहिती दिली. आपण कामाचा जाे दर्जा राखला आहे ताे यापुढे कायम ठेवणार आहे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी देशमुख सर शांततेने काम करतात. ज्याला अडथळ्यांवर मात करणे जमते तसेच स्वत:च्या क्षमतेवर विश्वास असताे तेच लाेक अशाप्रकारे काम करू शकतात, असे बाेलत गाेयल यांनी देशमुख यांच्या कामाचे काैतुक केले.
देशमुख म्हणाले, आपण सत्याच्या बाजूने असाल, हेतू चांगला असेल तर काेणालाही न घाबरता हिमतीने काम करावे, निर्णय घ्यावेत. जरी तुमच्याकडून चूक झाली तरी त्याचे स्पष्टीकरण देता येते. माझ्या यशात पाेलीस दलातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांचा खूप माेठा वाटा आहे.
संघटित गुन्हेगारी, बालगुन्हेगारीचे आव्हान
पुण्याच्या आकाराप्रमाणे येथे गुन्हेगारीही माेठी आहे. जिल्ह्यात औद्याेगिकीकरण आणि शहरीकरण वेगाने वाढत आहे. एमआयडीसी असल्याने स्थलांतरित कामगारांची संख्याही जास्त आहे. ग्रामीण दलाकडे केवळ अडीच हजार मनुष्यबळ आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणे, संवेदनशील गुन्ह्यांचा तपास करीत त्यात व्हीव्हीआयपी दाैऱ्यांचा बंदाेबस्त करावा लागताे. जिल्ह्यांत अवैध शस्त्र, संघटित गुन्हेगारी, बालगुन्हेगारीचे आव्हान असल्याचे डाॅ. अभिनव देशमुख म्हणाले.