पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याने पलायन केले. त्यानंतर आता येथील आरोपींच्या सुरक्षेकरिता दिवसपाळी व रात्रपाळीसाठी पोलीस मुख्यालय, कोर्ट कंपनी व पोलिस ठाण्याकडील गार्डची नेमणूक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गार्डवर सहायक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची निगराणी राहणार आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या पलायनामुळे शहर पोलिस दलाची बदनामी झाली. अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी काढले. ससून हॉस्पिटल येथे खास आराेपींवर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या गार्डवर विभागीय सहायक पोलिस आयुक्त व संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षक रोज दिवसा चेक करतील. त्याचप्रमाणे रात्र गस्तीस असणारे सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त व विभागीय रात्र गस्त व पोलिस स्टेशन रात्र गस्त अधिकारी हे रात्री नियमितपणे या गार्डची तपासणी करतील. त्या ठिकाणी पाहणी करून काही आक्षेपार्ह नाही ना? याबाबत खात्री करतील. गार्ड सतर्क असल्याबाबत खात्री करून त्याबाबत स्टेशन डायरी व भेट रजिस्टरमध्ये नोंद घेतील. तसे नियंत्रण कक्षाला तत्काळ वायरलेसमार्फत कळवतील. नियंत्रण कक्ष अधिकारी ही माहिती वरिष्ठांना सादर करतील.
ससूनला अचानक भेट देऊन पाहणी करतील
परिमंडळ-२चे पोलिस उपायुक्त व पोलिस उपायुक्त गुन्हे हे आठवड्यातून एक वेळा ससून रुग्णालयाला भेट देतील. अपर पोलिस आयुक्त, गुन्हे हे १५ दिवसांतून एकदा ससूनला अचानक भेट देऊन पाहणी करतील. तसेच आवश्यक ती कार्यवाही करतील. -रितेशकुमार, पोलिस आयुक्त
पोलिस मुख्यालय कोर्ट कंपनीमार्फत जेथे बंदोबस्त पुरविला जातो, गार्ड नेमले जातात यामध्ये काही पोलिस उपनिरीक्षक व ११० कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे. हे गार्ड व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची तपासणी करण्याचे काम मुख्यालय व कोर्ट कंपनीतील पोलिस अधिकाऱ्यांकडे असते. त्यांच्याकडून हे काम व्यवस्थित होत नसल्याचे लक्षात आल्याने आता बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि लष्कर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यापूर्वी ससून रुग्णालय हे पोलिसांच्या चेकिंगमध्ये स्थान नव्हते. या घटनेमुळे आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नियमित भेट देण्याचे ठिकाण निश्चित झाले आहे.