जुन्नर (पुणे) : ट्रॅक्टरचे शासकीय मंजूर अनुदान मिळण्यासाठी चार हजार रुपयांच्या रकमेची लाच स्वीकारताना जुन्नर कृषी विभागातील पर्यवेक्षक बापू एकनाथ रोकडे (५७, रा. जुन्नर) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी ही माहिती दिली.
या घटनेतील तक्रारदार शेतकरी यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर करण्यात आला होता. यासाठीची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी केलेली होती. जुन्नर कृषी विभागाच्या कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक रोकडे यांनी ट्रॅक्टरचे मंजूर अनुदान मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
यातील चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रोकडे यांना तालुका कृषी कार्यालयातच सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करत आहेत. रोकडे यांच्यावरील कारवाईने जुन्नर तालुका कृषी कार्यालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे, तर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना लाचप्रकरणी अटक झालेले रोकडे अडचणीत आले आहेत.