पुणे : जिल्ह्यातील पाणीटंचाई उपाययोजनांसंदर्भात पूरक आराखडा १५ एप्रिलपर्यंत तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दीपक कुलकर्णी यांनी सभागृहाला दिली. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर ते नोव्हेंबर, जानेवारी ते मार्च आणि मार्च ते जून असा तीन टप्प्यांमध्ये २१ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला नुकतीच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील अनेक टंचाईग्रस्त गावांची नावे नसल्याचे सदस्यांनी पाणीटंचाई आढावा बैठकीमध्ये निदर्शनामध्ये आणून दिले. प्रत्येक तालुक्यामधील १० ते १५ गावे टंचाईग्रस्त आहेत. मात्र, आराखड्यामध्ये फक्त काहीच गावांचा समावेश केला आहे. नागरिकांनी मागणी करूनही टँकर सरू केला जात नाही.भूजल सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केले जाते. त्यामुळे विंधन विहिरी घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही. शास्त्रीय पद्धतीने भूजल सर्वेक्षण करावे आदी मागण्या करण्यात आल्या. अनेक जिल्हा परिषद सदस्य स्वखर्चाने गावामध्ये टँकर पाठवत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या टंचाई आढावा बैठकीमध्ये सदस्यांनी दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते म्हणाले, की सदस्यांनी तत्काळ आपले प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करावेत. जिल्हाधिकाऱ्यांशी पाणीटंचाईचा आराखड्या- संदर्भात तत्काळ नियोजन करण्याची मागणी केली जाणार आहे.
पूरक आराखडा १५ एप्रिलला तयार करणार
By admin | Published: April 09, 2017 4:29 AM