पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला. सोमवारी शहर आणि जिल्ह्यात सहा हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला. तर मंगळवारी दिवसभरात ३७९७ इंजेक्शनचे वाटप नियंत्रण कक्ष मार्फत केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला अतिरिक्त ३००० इंजेक्शन्स दिले आहेत. असा एकूण १२७९७ इंजेक्शन रुग्णालयांना वितरित केली आहे.
पुण्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंजेक्शनचा तुटवडा आणि औषध विक्रेत्यांकडून होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. औषध दुकानातून रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीला बंदी घातली आहे. रुग्णांना रुग्णालयातच इंजेक्शन पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. सोमवारपासून रुग्णालयांनी केलेल्या मागणीप्रमाणे नियंत्रण कक्षातून वितरकांमार्फत इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यामध्ये सोमवारी सहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध झाली होती. त्याचे संपूर्णपणे वाटप करण्यात आले. मंगळवारी ३७९७ इंजेक्शन उपलब्ध झाले असून त्याचे देखील वाटप रुग्णालयांना केले आहे. याशिवाय पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांना तीन हजार इंजेक्शन्स अतिरिक्त स्वरुपात दिल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.