लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता. त्यात एका कंपनीच्या १९०० इंजेक्शनचा वापरण्यास प्रशासनाने मनाई केल्याने रुग्णांना योग्य प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन मिळू शकले नव्हते. यामुळे प्रशासनाने इंजेक्शनची मागणी वाढवली होती. शुक्रवारी जिल्ह्यासाठी तब्बल ५ हजार १९२ इंजेक्शन उपलब्ध झाल्याने रुग्णांची धावपळ थांबणार आहे. रूग्णालयांनी केलेल्या मागणीनुसार समप्रमाणात या इंजेक्शनचे वितरण केले जाणार आहे. संबंधित कोविड रुग्णालयांनी त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व आैषध पुरवठादारनुसार त्यांच्याकडून तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार घ्यावेत. याबाबत कुठलीही सबब चालणार नाही. कोणत्याही प्रकारची दिरंगाई, टाळाटाळ तसेच कसूर होणार नाही, याची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेत्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.