पुणे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना नातेवाईकांकडूनच व्यसनाचे साहित्य पुरविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नातेवाईकांना घरचा डबा देण्याच्या नावाखाली सुरू असलेले हे प्रकार कडक तपासणीमुळे उघडे पडले आहेत. त्यामुळे आम्हाला डबे देण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागते, अशी ओरड करणाऱ्या नातेवाईकांना चपराक बसली आहे.
पहिल्या लाटेमध्ये वरदान ठरलेले जम्बो कोविड सेंटर १५ जानेवारीला बंद करण्यात आले होते. मात्र, ते मार्चमध्ये सुरू करण्यात आले. आतापर्यंत हजारो रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या काळात रुग्णालयाची क्षमता ७०० खाटांपर्यंत वाढविण्यात आली. दरम्यान, नातेवाईकांकडून त्यांच्या रुग्णांना डबे देण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात येत होता. वास्तविक रुग्णालयात जेवण देण्याची व्यवस्था आहे. मात्र, ग्रामीण भाग, पिंपरी चिंचवडमधून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक डबे घेऊन येतात.
रुग्णालय प्रशासनाने हे डबे स्वीकारून रुग्णांपर्यंत पोचविण्यास सुरुवात केली. मात्र, रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात तंबाखू खाऊन थुंकलेले, गुटख्याच्या पिचकाऱ्या दिसू लागल्या. हे साहित्य येते कुठून याचा शोध सुरू झाल्यावर डब्यांच्या पिशव्यांमध्ये हे साहित्य येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे या पिशव्यांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यापूर्वीही तपासणी केली जात होती. परंतु, मागील आठवड्यापासून ती अधिक कडक करण्यात आल्याचे जम्बोचे समन्वयक उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सांगितले. या तपासणीमधून तंबाखू-चुना, गुटखा, पान मसाला, सुपारी आदी साहित्य पुरविण्यात येत असल्याचे समोर आले. त्यामुळे ही तपासणी आणखी कडक करण्यात आली आहे. नातेवाईकांनी रुग्णाच्या तब्येतीचा विचार करून असे साहित्य पुरवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-----
जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना घरचा डबा देण्याची मुभा आहे. मात्र, काही रुग्णांचे नातेवाईक त्याचा गैरफायदा घेत आहेत. व्यसनाचे साहित्य रुग्णांना पुरविणे हे त्यांच्याच प्रकृतीच्यादृष्टीने घातक आहे. आम्ही तपासणी अधिक कडक केली आहे. नातेवाईकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
- राजेंद्र मुठे, समन्वयक, जम्बो कोविड रुग्णालय तथा उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग
फोटो -