लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांना रेमडेसिविर मिळविण्यासाठी नातेवाईकांची वणवण सुरू आहे. मात्र, संबधित रुग्णालयांनी रुग्णाच्या नावासह यादी दिल्यावरच त्यांना औषध पुरवठादारांकडून इंजेक्शन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी रुग्णालयांना त्यांच्या लेटरहेडवर मागणी नोंदवावी लागणार आहे.
डॉ. देशमुख यांनी सांगितले की, संबंधित कोविड रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णांच्या नावाची यादी दिली आहे. त्याप्रमाणे त्यांनी मागणी नोंदविल्यानुसार औषध पुरवठादाराकडून तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करून घ्यावेत. त्यासाठी रूग्णालयांना लेटरहेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय वाजवी दरात करायचे आहे. भरारी पथकांची यावर नजर राहणार असून वाटप तक्त्यानुसार वाटप झाले की नाही हे पाहणार आहेत.
पुण्यासाठी ४ हजार ३११ रेमडेसिविर उपलब्ध
गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण करणाऱ्या पुणेकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. शुक्रवारी पुण्यासाठी सुमारे ४ हजार ३११ रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड आणि जिल्हा या ठिकाणी ३०० हॉस्पिटलला वाटप करण्यात आले आहेत. पुण्यातील अनेक रुग्णांना शुक्रवारी देखील दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळेच पेशंटच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड नाराजी असून, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरुच आहे.