पुणे : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अंगणवाडीमध्ये वाटप करण्यात आलेला गूळ खाल्यावर एका पदाधिकाऱ्याला करंट लागला.... महिला सदस्यांना तरतरी आली....तर एका सदस्याने डोक्यात झटका बसल्याच्या प्रतिक्रिया सभेतच दिल्या. तर काही सदस्यांनी गुळाचा वास घेऊनच गुळाची टेस्ट करण्यास नकार दिला. हाच गुळ जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लापशी करण्यासाठी वाटप करण्यात आला आहे.जिल्ह्यातील तब्बल साडे चार हजार पेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांना पोषण आहारामध्ये चक्क हातभट्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या गूळाचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक बाब सदस्य दशरथ काळभोर यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निदर्र्शनास आले. या गुळावरून स्थायी समितीच्या बैठकीत प्रचंड गोंधळ झाला. काही सदस्यांनी गुळाची टेस्ट देखील केली. त्यानंतर वरील वेगवेगळ््या प्रतिक्रिया आल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी वाटप करण्यात आलेल्या गुळाची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. तसेच गुळाचे नमुने अन्न व औषध प्रयोगशाळेत तपासून घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले.हवेली तालुक्यातील येवलेवाडी, कात्रजच्या वाड्या, सिंहगड रस्ता परिसरातील जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार बालकांना दिला जातो. त्यामध्ये हा प्रकार आढळून आला. गहू आणि तांदूळ शासनामार्फत दिला जातो. परंतु तूर डाळ, कडधान्य, गूळ, भरड धान्य पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदे मार्फत स्वतंत्र पुरवठादारांकडून पुरविण्यात येतो. (प्रतिनिधी)दशरथ काळभोर यांनी आलेला गूळ अत्यंत निकृष्ट दर्जांचा असल्याचा आरोप केला आहे. गूळ पावडर पुरविण्यात आली असे सांगितले जात असताना गुळामध्ये मोठ-मोठे खडे असून, फुटत देखील नाही. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ झाल्यानंतर देसाई यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अंगणवाडीतील बालकांना निकृष्ट दर्जाच्या गुळाचा पुरवठा
By admin | Published: June 15, 2016 4:49 AM