पुणे: राज्यातील सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ राबविली जात आहे. या योजनेंअंतर्गत २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात पुणे विभागातील २ हजार ५०८ अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण १० कोटी ४६ लाख ७५ हजार जमा झाले,असे पुणे विभागीय प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितले.
स्वाधार योजनेसाठी पुणे विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी एकुण २ हजार ५०८ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.त्यात पुणे जिल्ह्यातील १ हजार ३९१, साता-यातील ११०, सांगलीमधील २६०, सोलापूर येथील २८४ आणि कोल्हापूरमधील ४६३ विद्यार्थ्यांच्या अर्जाचा समावेश आहे.इयत्ता अकरावी,बारावी आणि बारावीनंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांसाठी 2017 पासून ही योजना राबविली जात आहे.
राज्यात सामाजिक न्याय विभाग अंतर्गत ४४१ शासकीय वसतीगृहे चालविली जात असून त्यात २३४ मुलींची तर २०७ मुलांची वसतीगृहे आहेत. दोन्ही वसतीगृहातील विद्यार्थी मान्य संख्या ४१ हजार ४८० आहे. परंतु,राज्यात दिवसेंदिवस व्यवसायिक, बिगर व्यवसायिक महाविदयालयांची संख्या वाढत आहे. त्यात शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने ‘स्वाधार योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेनुसार विद्यार्थ्यांना भोजन ,निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाते.
पुणे, पिंपरी चिंचवड , या ठिकाणी शिक्षण घेण्या-या विद्याथ्यांनासाठी प्रतिवर्ष ६० हजार रुपये, क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांनासाठी प्रतिवर्ष ५१ हजार रुपये तर इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ४३ हजार रुपये रक्कम दिली जाते.सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सोळंकी यांनी केले आहे.