बंदला रिक्षा व स्कुलबस संघटनांचा पाठिंबा ; प्रत्यक्ष सहभाग नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 08:05 PM2018-09-09T20:05:57+5:302018-09-09T20:13:04+5:30
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल.
पुणे : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी (दि. १०) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय रिक्षा व स्कुलबस संघटनांनी घेतला आहे. या संघटनांनी बंदला पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये प्रत्यक्ष सहभाग नसेल. तसेच पीएमपीची बस वाहतुकही नियमितपणे सुरू राहणार आहे.
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाने भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह अन्य काही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडू लागले आहे. त्यामुळे या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. मात्र, मागील महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा बंद नको, अशी भावना अनेकांची झाली आहे. परिणामी काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी न होण्याची भुमिका संघटनांनी घेतली आहे. तसेच काँग्रेसकडूनही बंदबाबत या अधिकृतपणे चर्चा झाली नसल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
काँग्रेसने ज्या कारणासाठी बंद पुकारला आहे, त्याला रिक्षा पंचायतचा पाठिंबा आहे. सर्व रिक्षा सीएनजीवर चालणाऱ्या असल्या तरी पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्यत्र महागाई वाढली आहे. त्याचा फटका रिक्षाचालकांनाही बसत आहे. त्यामुळे या बंदला आमचा पाठिंबा आहे. मात्र, बंदमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. सर्व रिक्षा सोमवारी सुरू राहतील. परिस्थती पाहून रिक्षा चालक निर्णय घेतील, असे रिक्षा पंचायतचे नितीन पवार यांनी सांगितले. स्कुल बसही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्कुल बस असोसिएशनचे राजेश जुनवणे यांनी स्पष्ट केले. मागील महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बंद झाले होते. त्यामुळे आता पुन्हा बंद करण्याची मानसिकता नाही. संघटनेच्या पातळीवरही याबाबत चर्चा नाही. काँग्रेसकडून योग्य कारणासाठी बंद पुकारला जात असला तरी त्यात स्कुल बस सहभागी होणार नाहीत, असे जुनवणे यांनी स्पष्ट केले.
पीएमपी बस सुरू राहणार
भारत बंद दरम्यान पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा नियमितपणे सुरू राहणार आहे. वेळापत्रकानुसार सर्व बस मार्गावर धावतील. बंदची स्थिती पाहून त्यावेळी बस कमी करणे किंवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पीएमपी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.