- प्रज्ञा केळकर-सिंग, पुणेअल्पवयीन मुला-मुलींमध्ये आयुष्याच्या नाजूक वळणावर बरेच शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांशी जुळवून घेताना तात्पुरते आकर्षण, लैंगिक अथवा शारीरिक शोषण अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या असतात. बऱ्याचदा, भीतीमुळे या समस्यांबाबत मुलांना आई-वडिलांशी संवाद साधता येत नाही. अशा वेळी लहान मुलांसाठी असणाऱ्या हेल्पलाईन उमलत्या फुलांना आधार वाटत आहेत. जाणीव-जागृती कार्यक्रम, शाळांमधील मार्गदर्शक प्रशिक्षण आदी उपक्रमांंमुळे हेल्पलाईनचा लाभ घेणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुस्कान या संस्थेतर्फे बाललैंगिक अत्याचार, बालक संरक्षण कायदा, मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन आदी विविध विषयांवर काम केले जाते. बऱ्याचदा मुलांना काही समस्यांबाबत अथवा तक्रारींबाबर पालकांशी बोलता येत नसल्याने आपले म्हणणे मांडता यावे, यासाठी ही हेल्पलाईन कार्यरत आहे. याबाबत सांगताना मुस्कान संस्थेच्या प्रकल्प समन्वयक नंदिता अंबिके म्हणाल्या, ‘‘बऱ्याचदा मुलांचे जवळच्या व्यक्ती, कुटुंबीय, समवयस्क आदींकडून लैंगिक शोषण केले जाते. ही घटना अथवा प्रसंगाबाबत पालकांशी बोलताना मुलांना, विशेषत: मुलींना अनामिक भीती वाटते. आई-बाबा आपले शिक्षण बंद करतील, हे भयही त्यांना सतावत असते. अशा वेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुले हेल्पलाईनचा आधार घेऊ शकतात. बऱ्याचदा मुलांप्रमाणेच पालकही या हेल्पलाईनच्या साह्याने तज्ज्ञांशी संपर्क साधू शकतात.’’‘ज्ञानदेवी चाईल्ड लाईन’ संस्थेच्या हेल्पलाईनवरही बालकांशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी नोंदवल्या जातात. शारीरिक शोषण, बालविवाह, बालकामगार, आई-वडिलांशी संबंधित समस्या अशा विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी चाईल्ड लाईनकडे फोन येतात. काही जणांना नाव गुप्त ठेवून मार्गदर्शन हवे असते. बरेचदा, फोन आल्यानंतर मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. सुडाच्या भावनेतून अथवा त्रास देण्याच्या हेतूने खोट्या तक्रारी दाखल केल्या जाऊ नयेत, यासाठी फोन कॉलची वैधता तपासली जाते. गरज भासल्यास, पोलिसांचे सहकार्य अथवा मानसिक समुपदेशन केले जाते. किशोरवयीन मुलांशी संबंधित प्रकरणे नाजूकपणे आंिण संवेदनशीलतेने हाताळली जातात. चाईल्ड लाईन हा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते १९ वयोगटातील मुला-मुलींकरिता २४ तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. सन २०१४-१५ या वर्षात चाईल्ड लाईनकडे ४१० प्रकरणे व २,३७९ फोन कॉल्स आले. या हेल्पलाईनवर लैंगिक शोषण, व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बालभिक्षेकरी या समस्यांशी संबंधित तक्रारी नोंदवल्या जात असल्याचे आणि तज्ज्ञांच्या टीमकडून निराकरण केले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रकरणांमधील गांभीर्य पाहून संस्थेतर्फे शेल्टरसाठी बालकल्याण समितीची मदतही घेतली जाते. आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम आणि त्यातून घडणारे गुन्हे अशा प्रकारच्या तक्रारीही हेल्पलाईनवर नोंदवल्या जातात. कोणत्याही तक्रारीचे निवारण करताना मुलांची बाजू शांतपणे ऐकून घेण्यावर जास्त भर दिला जातो.- अनुराधा सहस्रबुद्धे
उमलत्या मुलांना हेल्पलाईनचा आधार
By admin | Published: September 28, 2016 4:53 AM