पुणे-
पुण्याच्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत आता वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत होणार आहे. कारण मनसेनं निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. त्यासोबत वंचिन बहुजन आघाडीनंही उमेदवारी दिलेली नाही. पण भाजपामध्ये पक्षांतर्गत नाराजीमुळे टेन्शन वाढलं आहे. हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यामुळे मतदार संघात हिंदू मतांमध्ये फूट पडणार असल्याचं चित्र आहे. याचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.
आनंद दवे यांनी आता थेट राज ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. "आपल्याला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल", असं सूचक विधान करत आनंद दवे यांनी थेट राज ठाकरेंना ऑफर दिली आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढच्या आदेशापर्यंत कुणाचाही प्रचार करू नये अशा सूचना दिल्या आहेत. पण आता आनंद दवे यांनी राज ठाकरेंकडे पाठिंब्याची मागणी केली असल्यानं मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलं आहे. "मनसेने मला पाठिंबा द्यावा. मनसेचा एक आमदार वाढेल. राज ठाकरे आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत. त्यांचं आणि आमचं हिंदुत्व आक्रमक आहे. आरक्षणाची भूमिकाही सारखीच आहे. त्यामुळे राज यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला हवा", असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. समर्थ रामदास स्वामी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत आमची मते सारखीच आहेत. मनसेने कसबा निवडणूकीत मला पाठिंबा दिला तर माझा विजय सुकर होईल, असंही ते पुढे म्हणाले.