लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी : छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड येथे रोप-वेसाठी स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
किल्ले राजगडावरील रोप-वेसंदर्भात काही शिवप्रेमी संघटना विरोध करत असताना राजगडावर रोप-वे हवा की नको, यासाठी लव्ही बैठकीचे येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यातील स्थानिक मावळे रोप-वेच्या समर्थनार्थ एकवटले असून किल्ले राजगडासह किल्ले तोरणावर देखील सुद्धा रोप-वे व्हावा अशी मागणी एकमुखाने करत रोप-वेला पाठिंबा दर्शविला आहे.
लव्ही (ता. वेल्हे) येथील मंदिरात रविवारी (दि. २७) या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, भोर वेल्हे कृती समिती अध्यक्ष, माऊली दारवटकर, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, शंकर भुरूक, संतोष रेणुसे, आनंद देशमाने, गुलाब रसाळ, शंकर रेणुसे, गणेश खुटवड, करणसिंह बांदल, बाळाजी सणस, प्रदीप मरळ, विकास नलावडे, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे, राहुल वालगुड. दत्ता नलावडे, संदीप कुंभार, सोनू वालगुड. पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, आदींसह बारा गाव मावळ परिसरातील व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन
किल्ले राजगड स्थानिक मावळे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते. इतिहास संशोधक दत्ता नलावडे म्हणाले की, किल्ले रायगडच्या धर्तीवर किल्ले राजगडावर राजगड विकास प्राधिकरण होण्यासाठी या किल्ले परिसरातील ग्रामपंचायतीने ठराव होणे गरजेचे आहे. या माध्यमातून गडांचा व परिसराचा विकास होईल. यावेळी किल्ले राजगडावर रोप-वेला पाठिंबा देण्यासाठी वेल्हे पंचायत समितीच्या माध्यमातून ठराव दिला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांनी दिली. तर मेरावणे सरपंच सत्यवान रेणुसे, पाल बुद्रुकचे सरपंच गोरक्ष शिर्के, लव्ही गावचे उपसरपंच नंदू रसाळ, मेटपिलावरे सरपंच, वाजेघर सरपंच यांनी रोपवे पाठिंबा ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार केले असल्याची माहिती दिली.
चौकट
किल्ले राजगडवर हजारो पर्यटक येत असतात. रोप-वेमुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. यामुळे रोपवे म्हणजे विकासाचा राजमार्ग आहे. - रेवणनाथ दारवटकर, संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कोट
वेल्हे तालुक्यातील जनतेसाठी पर्यटन हा एकच पर्याय असून, किल्ले राजगडासह किल्ले तोरणावर सुद्धा रोप-वे झाला पाहिजे.
-माऊली दारवटकर, अध्यक्ष भोर वेल्हा कृती समिती
फोटो : लव्ही(ता.वेल्हे) पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर बैठकीत चर्चा करताना
चौकटीसाठी ओळ