पुणे : रेल्वे स्थानक व परिसर तसेच रेल्वेगाड्यांमध्ये घरातून पळून आलेली, चुकलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना आई-वडिलांपर्यंत पोहचविणे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सावित्रीबाई फुले पथक तैनात केले आहे. या पथकाने मागील महिनाभरात पुणे स्थानकातून ९ मुले व ३ मुलींना आई-वडील व स्वयंसेवी संस्थांकडे सुपुर्द केले आहे.
आरपीएफकडून रेल्वे स्थानकांवर लहान मुलांच्या मदतीसाठी स्वतंक्ष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षामार्फत हरविलेल्या किंवा पळून आलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहचविले जातात. महिलांच्या सुरक्षेसंदर्भातही आरपीएफकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी आता ‘सावित्रीबाई फुले पथक’ तैनात केले आहे. विभागीय सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार यांच्या संकल्पनेतून हे पथक महिनाभरापासून कार्यरत आहे. आरपीएफचे महिला कर्मचारी शकिला शेख यांच्यासह सुशिल चौधरी, व आर, एस, भोर यांचा या पथकात समावेश आहे. या पथकाला रेल्वेगाड्या व स्थानकावर १२ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ९ मुलांसह ३ मुली आढळून आल्या. त्यांना आई-वडील व स्वयंसेवी संस्थांकडे सुपुर्द केल्याची माहिती पवार यांनी दिली.