देशात लोकशाही वाचविण्यासाठी शरद पवारांना साथ द्या : अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:35 PM2023-06-24T13:35:58+5:302023-06-24T13:38:42+5:30
चिंचोशी (ता. खेड) येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन...
शेलपिंपळगाव (पुणे) : एकीकडे महिला कुस्तीपटूंनी आपला हक्क मागितला तर त्यांना अगदी रस्त्यावरून फरफटत नेले जाते, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी केलेले काम सांगण्यासाठी आज टिफिन बैठका घेतल्या जात आहेत. भविष्यात देशाची लोकशाही वाचवायची असेल तर शरद पवारांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
चिंचोशी (ता. खेड) येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व गावातील नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे, जयसिंग दरेकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या दीपाली काळे, माजी उपसभापती वैशाली गव्हाणे, बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे, हनुमंत कड, विनोद टोपे, कमल कड, माजी संचालक धैर्यशील पानसरे, रोहिदास होले, विनायक घुमटकर, विलास कातोरे, सरपंच उज्ज्वला गोकुळे, उपसरपंच माया निकम, सरपंच आश्विनी साबळे, दौलत मोरे, अध्यक्ष देवानंद निकम, बजरंग दरगुडे, पांडुरंग निकम, ॲड. बाबासाहेब दरगुडे, बाबाराजे दौंडकर, युवराज भोसकर, विशाल दौंडकर, शुभम पोतले, संदीप गाडे, ग्रामसेविका सारिका गोरडे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच उज्ज्वला गोकुळे यांनी, तर देवानंद निकम यांनी आभार मानले.
‘शरद पवारसाहेबांनी राज्यात ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. साखर कारखाने उभारले. दूध व्यवसायाला चालना दिली. ज्यामुळे राज्याचा विकास होण्यासाठी अधिक चालना मिळाली. याउलट आजच्या काळात लोकांना कृषिमंत्र्यांचेही नाव सांगता येत नाही. ‘जो बोलगा, उनका कान कटेगा’ अशी भयावह परिस्थिती आहे. केंद्र शासन राम मंदिर कामासाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब देत नाही. भविष्यात चांगल्या नेतृत्वाला संधी देऊन शरद पवारांच्या मागे खंबीर उभे रहा.’
- दिलीप मोहिते - पाटील, आमदार, खेड