आळंदी : येथील ज्ञानगंगा स्कूलच्या शालेय मुलांनी रक्षाबंधनावर होणारा खर्च बचत करून, केरळ बांधवांच्या मदतीसाठी निधी जमा केला. यावेळी ११ हजार रुपये जमा झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांनी सांगितले.
रक्षाबंधन कार्यक्रम; तसेच आळंदीतून मदतफेरी काढत शालेय मुलांनी केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. यासाठी जनजागृती करीत शालेय, मुले, मुली, नागरिक, पालक आणि संस्था चालकांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत सढळ हाताने मदत फेरीत आपले योगदान दिले. या वेळी ज्ञानगंगा इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय गुळवे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेतील बाळासाहेब देशमाने, गणेश वाजे, ज्ञानोबा सूळ, भाग्यश्री गंधे, नीता करसाळे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. केरळमध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. यामुळे देशातून पूरग्रस्तांसाठी मदत सुरू झाली. यातून आदर्श घेत आळंदीतील ज्ञानगंगा स्कूलच्या शालेय मुलांनी संस्थेच्या मार्गदर्शनातून मदतीसाठी हात दिला. सदर आर्थिक निधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठविण्यात येणार असल्याचे गुळवे यांनी सांगितले.