पुणे : कोरोना महामारीने रुद्रावतार धारण केल्याने समाजातील उपेक्षित घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन वंचित विकास संस्थेमार्फत लालबत्ती भागातील सर्व मुले, गरजू महिला, वृद्ध महिला, अपंग महिला, ए.आर.टी. पेशंट, टी.जी. यांच्यासह रिक्षाचालकांना रोज नियमित गरम, ताजा आणि पोटभर नाश्ता देत आहे. १६ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण वस्तीमध्ये जाऊन वंचित विकास संस्थेच्या कार्यकर्त्या हा नाश्ता देत आहेत. या सर्व ठिकाणी महिलांबरोबर नियमित संपर्क आहे. नाश्ता देतानाच मास्क वापर, सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत जागृती केली जात आहे.
सध्याच्या बिकट परिस्थितीमुळे, त्याचबरोबर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे येथील काही महिला खचल्या आहेत. त्यांना मानसिक आधार देणे, त्यांचे समुपदेशन करणे हेही संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. तृप्ती फाटक, प्रतिभा शिंदे आणि सुशीला कांबळे संस्थेमार्फत हे काम करत आहेत. सध्या रोज एकूण २५० मुले, महिलांपर्यंत ही मदत पोहोचवली जात आहे. गरज संपेपर्यंत हे काम सुरू राहील, असे वंचित विकास संस्थेने म्हटले आहे.
तृप्ती फाटक म्हणाल्या की, सध्या वस्तीतील महिलांचे काम बंद असल्याने त्यांच्यासह त्यांच्या मुलांचे हाल होत आहेत. कमाई थांबल्याने त्या सर्वजणी चिंतित आहेत. संस्थेच्या कार्यकर्त्या थेट वस्तीत जाऊन त्यांना मदत करत असल्याने त्यांच्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होत आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने त्यांना मदत करण्यासाठी पुढे यावे.