---
सासवड : पुरंदर तालुक्यात अलीकडच्या काळात गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांचा तपास करताना तपास यंत्रणा चांगलीच जेरीस आली आहे. परंतु आता अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी गावागावांतील ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल वरून हेल्पलाईनच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात घटनेची माहिती मिळताच आरोपींना पकडणे किंवा घडणाऱ्या घटना रोखण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यातील सासवडसह ग्रामीण भागात मोठे गुन्हे तसेच घडणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यास या यंत्रणेमुळे सहज शक्य होणार आहे. यामध्ये प्रत्येक गाव अथवा शहरातील ग्रामसुरक्षा यंत्रणेला प्रथम कार्यान्वित करून घेण्यात आले आहे. तसेच यंत्रणेला त्यांच्या मोबाईल वरती पोलिसांच्या माध्यमातून स्वतंत्र हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. आणि या हेल्पलाईन नंबरला गावातील सुरक्षा यंत्रणा आणि गावात जेवढे मोबाईल आहेत त्या सर्व मोबाईलचे क्रमांक जोडण्यात आले आहेत. या यंत्रणेत अमर्याद मोबाईल नंबर जोडता येतील. कारण संबंधित संदेश सर्वांपर्यंत त्वरित पोहोचणे हा यापाठीमागचा हेतू आहे.
सासवड शहरापासून ज्या भागाला जोडणारे रस्ते आहेत अशा सर्व रस्त्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. यामध्ये सासवड ते दिवे घाट, नीरा, माळशिरस, रीसे - पिसे, बोपदेव घाट, चीव्हेवाडी, कापूरहोळ, गराडे, वीर या रस्त्यांवरील गावे आणि व्यावसायिक, दुकानदार, भाजी विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार, पोलीस या सर्वाना जोडण्यात आले आहे. जेणेकरून एखाद्या घटनेत आरोपी कोणत्याही दिशेने पळून जात असेल तर केवळ वर्णनावरून सर्व दिशांना सतर्क करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
--
असे चालते यंत्रणेचे कामकाज
एखाद्या चोरी, घरफोडीची घटना घडली आणि आरोपी पळून जात असताना किंवा घटना स्थळावरच आरोपींना पकडण्यासाठी आपल्या जवळील मोबाईल वरून हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यावर या ग्रुप मध्ये जेवढ्या व्यक्ती किंवा जेवढे संपर्क नंबर असतील तेवढ्या सर्व लोकांना एकाच वेळी मेसेज जाईल. केवळ तीस सेकंदाचा हा कॉल असेल. विशेष म्हणजे जोपर्यंत आपण फोन घेत नाही तोपर्यंत फोनची रिंग वाजताच राहणार आहे. एकदा कॉल घेतल्यानंतर संबंधित परिसरात जेवढ्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींना घटना स्थळापर्यंत सहज पोहोचता येईल. आणि मदत करणे शक्य होणार आहे.
---
जाहिरातीसाठी नव्हे तर आपत्कालीन सेवेसाठीच
हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण एकाच वेळी हजारो व्यक्तींशी जोडले जाणार असल्याने आपल्या संपर्काची मर्यादा वाढणार आहे. त्यामुळे आपली वयक्तिक प्रसिद्धी करण्याचा मोह अनेकांना राहणार आहे. परंतु हि यंत्रणा केवळ आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवेसाठी असल्याने केवळ आपल्या परिसरांतील घडणाऱ्या गंभीर घटना, चोऱ्या, मारामाऱ्या, दरोडे, साखळी चोर, घरफोडी, अपहरण यांसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याव्यारिक्त वयक्तिक प्रसिद्धी, स्वतःची किंवा स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात, फेक कॉल यासाठी उपयोगात आणता येणार नाही. जरी तसा प्रयत्न केल्यास तो संदेश पुढे जाणार नाही अशी खास व्यवस्था करण्यात आली आहे. आणि सुरक्षा यंत्रणा ती हाताळणार असल्याने तातडीच्या मदतीसाठी उपयोगात आणली जाणार आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,