पुणे : आपल्या लोकसंख्येमुळे आणि जागतिक परिस्थितीमुळे सध्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपली तरुण पिढी अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून, त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनतर्फे (जितो) आयोजित जितो कनेक्ट २०१६ या तीनदिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी जागतिक परिषदेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अजय संचेती, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, जितो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, जितो झोन चेअरमन राजेश साकला, प्रसिद्ध विधितज्ज्ञ एस. के. जैन, उद्योगपती रसिकलाल धारिवाल, जितो अपेक्सचे पदाधिकारी तेजराज गुलेचा, राकेश मेहता, विजयकांत कोठारी, धीरज कोठारी, नरेंद्र छाजेड, अजित सेठिया आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, @‘‘ भारत हा सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश आहे. जगात अन्यत्र अर्थव्यवस्था संकटात असताना भारत मात्र प्रगती करत आहे. त्यामुळे आपल्याला जगभरात संधी निर्माण झाल्या आहेत. आपल्याकडे उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. तरुण पिढी जे प्रयोग करत आहे त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे आणि जितोसारख्या संघटनाच हे काम सर्वाधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.गोयल म्हणाले, ‘‘व्यापार वाढवायचा असेल, तर समाजाबद्दल संवेदना दाखवायला हवी. जैन समुदायाने प्रत्येक आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या देशात विश्वसनीय नेतृत्व असून प्रत्येक भारतीयात असाधारण कामगिरी करण्याची क्षमता आहे. ते साध्य होण्यासाठी देशात पारदर्शकता हवी आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ही आमची बांधिलकी आहे.’’अबकारी करांचा (एक्साईज) व इतर करांचा उल्लेख करून गोयल म्हणाले, की प्रामाणिक व्यापाऱ्यांना चिंता करण्याची काही गरज नाही. प्रामाणिकता असेल तर भीती कशाची? कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक व्यापाऱ्यांचा छळ होऊ देणार नाही. कामावर तुम्ही लक्ष ठेवा आणि गैरप्रकार व अपारदर्शकतेशी संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असेही गोयल म्हणाले.जितो चेन्नईकडून महाराष्ट्राला २१ लाखांची मदतजितो चेन्नईकडून मुख्यमंत्री सहायता निधीस २१ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश याप्रसंगी देण्यात आला. जितोतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त ५00 गावे दत्तक घेण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. दुष्काळ हटविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी जितोच्या वतीने काम करण्यात येणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ही जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत.साकला म्हणाले, ‘‘देशभरातून तरुण व विद्यार्थी पुण्यात शिकण्यासाठी येतात. त्यामुळे पुणे ही युवकांची शक्ती आहे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी जितो कनेक्टचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि त्यातून मोठे उद्योजक घडावेत, ही आमची इच्छा आहे.’’
तरुणांच्या नवीन प्रयोगांना पाठबळ द्या
By admin | Published: April 10, 2016 4:16 AM