पुणे - राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीत आता चांगलीच रंगत वाढत आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी एका पत्राद्वारे सर्वच राजकीय पक्षांना केली होती. भाजपनेही तसा आग्रह केला होता. मात्र, मागील काही निवडणुकांचा दाखला देत काँग्रेस व राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले. त्यामुळे, महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा सामना या दोन्ही मतदारसंघात पाहायला मिळतोय. सर्वांचं लक्ष लागलेल्या मनेसं अखेर येथील निवडणुकांसाठी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यानंतर, भाजपने मनसेचे आभार मानले.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी तर पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत आता होत आहे. तर, कसबा पेठ मतदारसंघा भाजपकडून हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात सामना रंगला आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीसाठी मनसेनंही आपली भूमिका जाहीर केली असून भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मनसेच्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केलं असून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
‘चिंचवड’ आणि ‘कसबा पेठ’ विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरे यांचे मनःपूर्वक धन्यवाद. राजकीय चौकटीपलिकडे मनाचा मोठेपणा दाखवत राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. पाठिंब्याच्या निर्णयानंतर मनसे नेते अनिल शिदोरे, बाबू वागसकर, सरचिटणीस अजय शिंदे, ॲड. किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रवक्ते योगेश खैरे, गणेश भोकरे यांच्यासमवेत चर्चा केली. हा पाठिंबा महायुतीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली.
राष्ट्रवादीची मनेसवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगातप यांनी ट्विट करत मनसेवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, "कोथरूडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय...,बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत", अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.