धनकवडी : महाराष्ट्रातील कॉग्रेस (आय) च्या निष्ठावंत घराण्यांपैकी एक असलेल्या भोरच्या थोपटे परिवाराला मंत्रीपदापासून डावलल्याने माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे समर्थकांनी सोमवारी सकाळी भोर मतदारसंघात रस्त्यावर उतरुन कॉग्रेस (आय) च्या नेतृत्वाचे विरोधात जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केला. भोर, वेल्ह्या आणि मुळशी पाठोपाठ पुणे (कात्रज ) येथील दत्त दिगंबर वाहतूक संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत तीव्र निषेध व्यक्त केला.
कॉग्रेस (आय) चे आमदार संग्राम थोपटे यांचा आजच्या मंत्रीमंडळात समावेश निश्चित समजला जात होता. आठवडाभरा पासुन आमदार संग्राम थोपटे यांची कॅबिनेटपदी वर्णी लागेल अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. थोपटे समर्थक व कॉग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना देखील संग्राम थोपटे हे सोमवारी शपथ घेणार असा आत्मविश्वास होता. मात्र सोमवारी सकाळी मंत्रीमंडळ विस्तारापुर्वीच थोपटे यांच्या नावाला फुली मारल्याची अधिकृत बातमी येताच भोर- वेल्हा मुळशी पाठोपाठ पुणे परिसरातील कात्रज, धनकवडी, बालाजीनगर येथील कार्यकर्ते सैरभर झाले आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला व त्यांनी रस्त्यावर उतरुन कॉग्रेस पक्ष नेतृत्व नेत्यांचे विरोधात जोरदार घोषणा देऊन नेत्यांचे पुतळे व पक्षाचे झेंडे जाळण्यास सुरूवात केली. भोर, नसरापुर, कापूरव्होळ, वेल्हे व पुणे येथील दत्तदिगंबर सहकारी संस्थेच्या आवारात सकाळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणा देऊन पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय नलावडे, दिलीप थोपटे, माजी वेल्ह्या तालुका अध्यक्ष दिलीप लोहकरे, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे अध्यक्ष विनायक देशपांडे, शामराव थोपटे, अर्जुन किंद्रे, दिलीप पानसरे, रामभाऊ रेणुसे, सुरेश कोडीतकर यावेळी उपस्थित होते.