पुणे : कुटुंबीयांचा सहभाग असल्याची शहानिशा होत नाही, तोपर्यंत त्यांची नावे हुंडाबळीसारख्या प्रकरणात घेण्यात येऊ नयेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे कौटुंबिक वाद आणि हुंडाबळी सारख्याप्रकरणात नाहक अडकवल्या जाणाऱ्या सासरच्या मंडळींना दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जोपर्यंत संबंधित नातेवाइकाचा त्या प्रकरणात सहभाग स्पष्ट होत नाही, तोपर्यंत त्याला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यात येऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारीच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबतील, असा विश्वास प्रक्टिस करणा-या वकिलांनी व्यक्त केला आहे.
जोपर्यंत गुन्हा शाबीत होत नाही तोपर्यंत आरोपी हा गुन्हेगार नसतो. या कायद्यांर्तगत तक्रार झाल्यानंतर समुपदेशन करावे आणि त्यानंतर एफआयआर दाखल करायची, अशी प्रक्रिया आहे. पूर्वी एफआयआर नोंदवून मग चौकशी व्हायची. त्यामुळे दोषी नसलेल्या व्यक्तींची नाहक बदनामी होता. या निर्णयमुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना खोट्या आरोपामुळे त्रास होणार नाही.- अॅड. आम्रपाली कांबळे-कसबे
उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. सासरच्या व्यक्तींना त्रास देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी दोषी नसतानाही त्यांची नावे घेतली होत आहेत, असे काही प्रकरणांमध्ये दिसून आले. या निर्णयामुळे गुन्ह्यातील सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पक्षकारांचा खरेपणा सिद्ध होत नाही तोपर्यंत याप्रकरणात नातेवाईकांचा सहभाग करणे चुकीचे होते.- अॅड. सुप्रिया डोंगरे
सूडाची भावना म्हणून कुटुंबातील व्यक्तींची नावे घेऊन त्यांना या प्रकरणात गोवण्यात येते. कुटुंबीयांना नाहक त्रास होत असल्याने पती अशावेळी पत्नीचे म्हणने मान्य करतो. त्यामुळे दबावतंत्र म्हणूनदेखील याचा वापर होत. त्या प्रकारांना या निकालामुळे लगाम बसेल.- अॅड. अभय शिरसट
या प्रकरणांमध्ये नणंद अनेकदा टार्गेट केली जाते. सासू-सासरे देखील लिस्टवर असतात. नणंद परदेशात राहायला असली, तरी तिचे नाव तक्रारीमध्ये देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. नणंदेने फोनवरून किंवा घरी आल्यानंतर भावाच्या संसारात लक्ष घातले असेल तर तिच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र यासर्वांची सत्यता तपासणे गरजेचे आहे.- अॅड. सुनीता जंगम
गुन्हा दाखल झाल्यानंतर, अटक होऊ नये किंवा खोट्या गुन्ह्यात अडकले जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे घटना नेमकी काय आहे, त्यात दोष कोणाचा आहे, यानुसार संबंधितांना अटक होणे गरजेचे आहे. या निकालातून ते साध्य होईल.- अॅड. अभिजित निंबकर