पुणे : बांधकाम व्यावसायिकाला २ कोटी व जागा मागत दीड लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याचवेळी दुसरीकडे आणखी एक फसवणुकीचा गुन्हा रवींद्र बर्हाटेविरोधात दाखल करण्यात आला आहे.कोथरुड पोलिसांनी रवींद्र बर्हाटे, बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन व एका महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात रवींद्र बर्हाटे हा अजूनही फरार आहे. त्याचा अटकपूर्व अर्ज सत्र न्यायालय व नंतर उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आता त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम आर शहा यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. जमिनीबाबत समजूतीचा करारनामा करुन परस्पर दुसर्याला विकून १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी रवींद्र बर्हाटे याच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद गोकुळ ढोणे, सचिन श्रीरंग ढोणे, सुनिल पांडुरंग खेडेकर, रवींद्र लक्ष्मण बर्हाटे , नंदा लालदास जोरी, राकेश लालदार जोरी, राजश्री दीपक चौधरी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उत्तम सदाशिव केदारी (वय ७०, रा. केदारी रेसिडेन्सी, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ मे २०१४ ते २० जून २०१५ दरम्यान घडला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, उत्तम केदारी यांच्याबरोबर आरोपींनी संगनमत करुन जमिनीबाबत समुजतीचा करारनामा केला होता. त्यानंतर त्या जमिनीसाठी फिर्यादी यांच्याकडून १८ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी ती जमीन परस्पर दुसऱ्या विकून फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीकडे विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. आरोपींच्या दहशतीमुळे इतकी वर्षे त्यांनी तक्रार दिली नव्हती. सहायक पोलीस निरीक्षक जगताप अधिक तपास करीत आहेत.
सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळला रवींद्र बर्हाटेचा अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 4:10 PM