पुणे : तळजाई टेकडीवर १०८ एकरामध्ये साकारण्यात येणाऱ्या ‘ऑक्सिजन पार्क’चा मार्ग मोकळा झाला असून उर्वरीत जागेचे रखडलेले भूसंपादनही पूर्ण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये जागेच्या वादामधून सुरु असलेल्या खटल्यात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला आहे. पुण्याची फुफ्फुसे असलेल्या टेकड्यांपैकी महत्वाच्या तळजाई टेकडीवरील जागांच्या भूसंपादनाची प्रक्रिया २००३ साली सुरु झाली होती. शासनाने भूसंपादनासाठी 2005 साली निवाडा जाहिर केल्यानंतर जमीन मालकांना चार टक्के दराने मोबदलाही देण्यात आला. त्यासाठी पालिकेने २७ कोटी रुपये शासनाकडे जमा केले. काही जमीन मालकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पालिकेच्याविरुद्ध निकाल गेला. पालिकेने त्याला सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. पालिकेच्या २०१७ साली मंजूर झालेल्या विकास आराखड्यामध्ये उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले. परंतू, संगमवाडी, बिबवेवाडी आणि तळजाई टेकडीवरील जागेसंदर्भात निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता. या जागेवर पालिका वन उद्यान विकसीत करीत आहे. दरम्यान, या जागेचे आरक्षण बदलून भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचा आणि जमीन मालकांना जादा टीडीआर देण्याचा घाट काही लोक प्रतिनिधींद्वारे घालण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यातच राज्यातील सरकार बदलले.
काही महिन्यांपुर्वी याठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतू, नगरसेवकांनी तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांनी जोरदार विरोध करीत हे काम बंद पाडले होते. उद्यानाच्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने काम रखडले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यामध्ये पालिकेच्या बाजूने निकाल लागला असून तळजाई टेकडीवरील उद्यानाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. =====
ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी मी नगरसेवक असताना भूसंपादनाची प्रक्रिया सुरु केली होती. त्यामध्ये अनेक अडथळे आणण्यासोबतच अनेक आमिषेही दाखविण्यात आली. त्याला बळी न पडता पर्यावरणाचा विचार करुन प्रयत्न सुरु ठेवले. दरम्यान, जागा मालक अनेकदा न्यायालयात गेले. काही जागा मालक सर्वोच्च न्यायालयातही गेले. तेथेही सर्वोच्च न्यायालयात पालिकेच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे या उद्यानाचा मार्ग सुकर झाला असून पर्यावरण प्रेमी नागरिक, तळजाईवर फिरायला येणाºया नागरिकांचा हा विजय आहे. - सुभाष जगताप, नगरसेवक