धनकवडी : आंबेगाव येथील शिल्पकार सुप्रिया शिंदे या शरदचंद्र पवार यांचा पुतळा बनवत आहेत. या आव्हानात्मक कामाला खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच भेट दिली आणि समोर हुबेहूब साहेबांचा पुतळा पाहून ताई अक्षरशः अचंबित झाल्या. आंबेगाव परिसरातील विकासकामांच्या लोकार्पण दौऱ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी आवर्जुन पुतळ्याच्या कामाला भेट दिली आणि पुतळा पाहून शिंदे यांच्या कलेचं कौतुक केलं.
माहेरी वडिलांच्या गणपती बनवण्याच्या कारखान्यात मातीला आकार देणाऱ्या सुप्रिया शिंदे यांनी भारती विद्यापीठातील फाईन आर्टस् महाविद्यालयातून शिक्षण घेऊन शिल्पकलेला सुरूवात केली. पती शेखर शिंदे यांच्या भक्कम आधारावर माती, प्लॅस्टर, फायबर ते थेट पंचधातूचे पुतळे बनवण्यात यशस्वी झाल्या. गेल्या आठ वर्षांत मागणी प्रमाणे शेकडो कलाकृती आणि पुतळे राज्यासह देशभरात पोचवण्यात त्या यशस्वी झाल्या. याच प्रवासात पवार साहेबांच्या पुतळ्याची संकल्पना पुढे आली आणि ते आव्हान त्यांनी लिलया पेलले. या कामा ची फायबर कॉपी पुर्ण होवून पंच धातूचे दोन भाग पुर्ण झाले आहेत. साहेबांच्या चेहर्यातील अत्यंत सुक्ष्म बारकावे ठळकपणे जाणवतील यासाठी शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळेंकडून कौतुक
पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदेचं कौतुक केलंय.
आतापर्यंत साकारले अनेक पुतळे
सुप्रिया शिंदे यांनी मागणीनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस, रंगनाथ स्वामी, स्वामी नारायण, सुखदेव व भगतसिंह यांचे धातूचे पुतळे बनवून दिले आहेत. माजी खासदार कै. किसनराव बाणखीले यांच्या पुर्णाकृती पंचधातूच्या पुतळ्याचे काम पुर्ण केले असून अवजड साचे, ओतीव कामाची अत्यंत कठीण प्रक्रियेतून तब्बल चार महिन्यांच्या अथक प्रयत्नाने बाणखीले यांचा पुतळा साकारला.