पुणे महापालिका निवडणुकीला सात ते आठ महिने राहिलेले असताना राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक पालिकेचा कारभारात आणि राजकारणात लक्ष घालयला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या आधी दादांच्या राज्यात ताई लक्ष घालत असल्याने राष्ट्रवादी मध्ये काही नवीन समिकरणांना सुरुवात झाली आहे का अशी चर्चा रंगली आहे.
काहीच दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा प्रकरणावरून महापौर जमत नसेल तर राजीनामा द्या अशी टीका करून भाजप विरुध्द राष्ट्रवादी अशा नव्या वादाला सुरुवात केली होती. याचं उत्तर देताना आज महापौर मोहोळ यांनी या मागे कोण आहे ते सगळ्यांना ठाऊक आहे असं म्हणत थेट अजित पवार यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला होता. हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना सुळे आज दिवसभरात थेट महापालिकेच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. सकाळी रामटेकडी इथल्या कचरा डेपोला स्थानिक राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांबरोबर भेट दिल्यानंतर सुळे यांनी थेट महापालिका गाठली. त्यानंतर इथे सर्वपक्षीय नेत्यांसोबत त्यांनी स्वच्छ चा कचरा वेचकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर त्या तिथेच सुरू असलेल्या आंबिल ओढ्याच्या प्रश्नावरचा आंदोलनात सहभागी झाल्या.आंदोलकांनी अजित पवारांवर आरोप केल्यावर त्या थेट पुरावे द्या मी गुन्हा दाखल करेन असंही त्या म्हणाल्या.त्या बरोबर नंतर थेट आयुक्तांची भेट घेत त्यांनी हे प्रश्न मांडले.
विशेष म्हणजे आज महापालिकेत येण्याचे सुळे यांचे कोणतेही नियोजन नव्हते. कचरा प्रकल्पाला भेट दिल्यानंतर सुळे या राष्ट्रवादीचा नवीन कार्यालयात विविध विषयांवर बैठक घेणार होत्या.त्यामुळे सुळे यांच्या अचानक येणे आणि आक्रमक भूमिका घेण्यावरून चर्चा रंगली आहे.
याविषयी लोकमतशी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले "बाबा आढाव यांच्या कार्यालयातून मला स्वच्छच्या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती.सुळे यांनाही पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली त्यामुळे त्या सोबत आल्या.तिथेच आंबिल ओढ्यातील बाधित नागरिकांचे आंदोलन सुरू असल्याने त्यांना देखील भेट दिली.आणि यानंतर त्यांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली.
ताईंच्या बैठका जवळच असणाऱ्या राष्ट्रवादी ऑफिस मध्ये असल्याने त्या पालिकेत आल्या."