पुणे : निवडणुका जिंकण्याच्या नादात भारतीय जनता पक्ष सत्ता राबवायला विसरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात केली आहे. परिवर्तन युवा परिषदेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या की, काही वर्षांपूर्वी नेत्यांप्रती असणारा आदरभाव आता नसून यासाठी राजकारणीही जबाबदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात सरपंचही मंत्रालयात काम करून घेत असत आता मात्र तशी स्थिती राहिलेली नाही. लोकसभा चालवण्याची सत्ताधाऱ्यांची जबाबदारी ते विसरत असून एक दोन वेळा कामकाज बंद पडल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही असेही त्या म्हणाल्या. सलग पाच आठवडे आम्ही कामं सोडून अधिवेशनाला जातो आणि कामकाज होत नाही हे अत्यंत चुकीचं असल्याचंही त्या म्हणाल्या.
एकीकडे सत्ताधारी भाजप विरोधक कामकाज करू देत नाहीत म्हणून उपोषण करत असताना त्यांहे मित्रपक्ष घोषणाबाजी करतात ही मॅचफिक्सिंग नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. करायचंच होत तर भाजपने पहिल्या आठवड्यात उपोषण करायचं होत आणि ११ ते ५ करण्याऐवजी २४ तास करायचं होत असा टोलाही त्यांनी लगावला. उपोषण करून प्रश्न सुटत असतील तर आपण सगळे मिळून उपोषण करूयात असेही त्या म्हणाल्या. हे सर्व प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार होते असा ताशेरा त्यांनी मारला. भाजपचे उपोषण म्हणजे फक्त फार्स होता. त्यांच्याकडे सत्ता आहे तर त्यांनी निर्णय घ्यावेत असे आव्हान त्यांनी दिले. अवघड परिस्थितीतून मार्ग काढणारी व्यक्ती खरी नेता असते असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.