इंदापूर तालुक्यातील १२८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजने व उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी निमगाव केतकी येथे ऑनलाईन पद्धतीने झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सात जिल्हा परिषद मतदारसंघात, तसेच इंदापूर शहर येथे ऑनलाइन पद्धतीने कामांचे उद्घाटन केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, दत्तात्रय घोगरे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर, अभिजित तांबिले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे ,महिला तालुका अध्यक्ष छाया पडसळकर, कार्याध्यक्ष अतुल झगडे, तात्यासाहेब वडापुरे, मच्छिंद्र चांदणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे
उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळल्यामुळे, सर्वसामान्य जनतेच्या वेदना दुःख जवळून पाहिले आहेत. त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळे ते शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रत्येक घटकाला हक्काचे वाटतात. त्यांच्या अनुभवाचा जास्त फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गर्दी करू नये. व सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत. अशा सक्त सूचना लोकांच्या आरोग्यासाठी दिलेले आहेत.या सूचनेचे आपण तंतोतंत पालन करण्यासाठी,इंदापूर तालुक्यात उद्घाटनासाठी असणारा दौरा व इतर कार्यक्रम मी रद्द केलेले आहे.
केंद्रसरकारने खासदारांचा मिळणाऱ्या हक्काच्या निधीला कात्री लावली आहे. पण राज्य सरकार आणि अर्थमंत्री यांनी कामे करण्यासाठी कोणतीही कात्री लावलेली नाही. त्यामुळे झपाट्याने विकासात्मक कायापालट दिसत आहेत. इंदापूर तालुक्यातील एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
भरणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा लाकडी - लिंबोडी परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्याची होती. ही इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे व सरकारच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न,तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुटत आहे. औद्योगिक वसाहतीत नवे उद्योग व अद्ययावत सुविधा लवकरच निर्माण केल्या जातील.
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे ऑनलाईन विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे