कळस : राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य गुरुवारी सकाळी व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते. मात्र, दुपारी इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले, ‘ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागायला तयार आहे,’ असे सांगितले. ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल, तर मी माफी मागतो. त्यात कमीपणा कसला’, असे कराडकर म्हणाले. ‘मी सकाळी विविध विषयांवर बोललो; पण फक्त मोजकाच भाग दाखवला गेला. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळे माहीत आहे आणि उभ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे, कोण दारू पितात. त्यात काही विशेष नाही. सरकार दारू प्या म्हणतेय. कारण सरकारला त्यामधून महसूल मिळतो.’
सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने साताऱ्यात ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी वक्तव्य केले होते. मात्र, इंदापूर तालुक्यातील गोतोंडी या गावी पाच मंदिरांच्या कलशारोहणासाठी कराडकर आले असता, त्यांना या विषयावरती पत्रकारांनी विचारले असता कराडकर म्हणाले की, ‘माझे चुकले असेल, तर मी माफी मागायला तयार आहे. हा विषय आता वाढवू नका. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, कोण कोण दारू पितात,’ असे म्हणत पत्रकारांच्या पुढील प्रश्नांना उत्तर देणे त्यांनी टाळले.