पुणे : मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, मी सदर चित्रफीत पाहिली आहे. हा सर्व प्रकार गैरसमजातून झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचे आरोप करण्याइतके टोकाचे पाऊल उचलणे योग्य नसून, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
देशातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्याबाबबत पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याबरोबर आयाेजित बैठकीनंतर खासदार सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.
हा प्रकार गैरसमजातून-
सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातील चित्रफित दोन- तीन वेळा पाहिली. हा प्रकार घडला त्यावेळी आजूबाजूला प्रचंड गर्दी होती. जितेंद्र आव्हाड यांनी त्या गर्दीत खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील हात लावला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित महिलेला हाताने बाजूला केले. त्या गदारोळात नेमके काय झाले, हे कळत नाही. पण त्यावेळी त्या महिलेवर विनयभंग कसा काय होऊ शकतो. हा प्रकार गैरसमजातून झाला असून, संबंधित महिलेची देखील बाजू ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे टोकाचे पाऊल उचलने अयोग्य आहे.
राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढा-
दरम्यान आव्हाडांनी राजीनाम्याचा विषय डोक्यातून काढून टाकावा. मुंब्रा मतदार संघातील जनतेने जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिले आहे. ते एक चांगले लोकप्रतिनिधी आहेत. झालेल्या प्रकारावर आमदारकीचा राजीनामा देणे हा उपाय नाही. आम्ही देखील अनेक कार्यक्रमाला जातो, तेव्हा अशी गर्दी आणि गदारोळ होतो. मी 'भारत जोडो' यात्रेत गेले होते. त्यावेळी काही मुले माझा हात ओढत होती. आता मी त्याला विनयभंग म्हणायचे का, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी उपस्थित केला.