बारामती :बारामतीत बिबट्या सफारी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. प्रकल्पाबाबतविरोधी पक्ष नेते अजित पवार आणि आपण स्वत्र: सविस्तर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी १०० हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास ६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, याविरोधात माजी आमदार शरद सोनवणे यांनी आवाज उठवला होता. मात्र बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, सत्ता पालट होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द केला आहे.
हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. यावर खासदार सुळे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
खासदार सुळे म्हणाल्या, माझ्या माहितीप्रमाणे सरकार येऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. ज्यांना कामच करायचे नाही. रुसवे फुगवे आहेत, त्यांनी ५० खोके घेतले आहेत. त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असा टोला सुळेंनी लगावला.
सरकार येऊन अडीच महिने झाले तरी अनेक मंत्री अजून त्यांच्या कार्यालयातही गेले नाहीत. पालकमंत्र्यांची नेमणूक केली नाही. डीपी डीसीचे हक्काचे पैसेही खर्च होत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील विकास कामे ठप्प आहेत. महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेऊ असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना काढले. यावर अधिक भाष्य न करता आम्ही त्याची वाट बघतोय अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
बारामती किंवा पुणे जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने एक षडयंत्र होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपली खूर्ची वाचविण्यासाठी राज्य पणाला लावत आहे, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.