राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पालखी सोहळ्यात सामील झाल्या. त्यांनी दिवे घाटात काल फुगडी खेळली. आज पुन्हा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात यवत येथे सामील होत त्यांनी वारकऱ्यांची सेवा केली आहे. मात्र ही सेवा देताना त्यांनी भाजलेल्या भाकरीचा थेट संबंध महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जोडला जात आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना अजित पवार यांची नाराजी दूर करण्यात सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना सरकरमधला महत्त्वाचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस सावध भूमिका घेताना दिसत आहे.
शनिवारी दुपारी यवत गावातील भैरवनाथ मंदिरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जेवणाच्या सोयीसाठी सुप्रिया सुळे यांनी पिठलं भाकरी केली.