हडपसर : हडपसरला एकूणच पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस फार बिकट होत चालला आहे. सोलापूर रोड असो किंवा सासवड रोड नित्याची वाहतूक कोंडी पाहण्यास मिळते. या वाहतूक कोंडीत जर लोकप्रतिनिधी अडकले तर त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. आज फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर खासदार सुप्रिया सुळे याही या वाहतूक कोंडी मध्ये अडकल्या. त्यांनी आपल्या गाडीतून उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्यासाठी निवेदन दिले. मात्र त्यावर काहीही फरक पडला नाही. अजूनही या रोडवर मोठमोठे खड्डे आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचलेले आहे. साईट पट्ट्यांमध्ये मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या परिसरात होत असते. मंत्री, आमदार, खासदार या रस्त्याने जाताना वाहतूक पोलीस थांबवून वाहतूक कोंडी सुरळीतही होईल. मात्र सर्वसामान्य नागरिकांना, वाहन चालकांना या वाहतूक कोंडीस रोजच सामोरे जावे लागत आहे.
अनेक दिवसांपासून येथील स्थानिक कार्यकर्ते ग्रामस्थ याबाबत आवाज उठवत आहे, आंदोलनही करत आहेत, मात्र या रस्त्याची दुरावस्था पाहून अधिकाऱ्यांनाही घाम फुटत नाही. खासदार आता यावर काय करतील. याबाबत काही आदेश देतील का. याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज सुप्रिया सुळे या वाहतूक कोंडीत अडकल्याने किमान येथील नागरिकांची होणारी कोंडी त्यांना समजली असेलच. असा आशावाद येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. सोलापूर रस्त्यावर गेल्या तीन दिवसापासून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र ते पाणी काढण्यात प्रशासनाला यश येत नाही. त्यामुळे येथील वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे.