Pune Bopdev Ghat Crime : पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवरील बलात्काराचे घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं आहे. तिघांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आलं असून पोलिसांनीकडून आरोपींचा शोध सुरु आहे. मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. मंगळवारी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटना स्थळाची पाहणी केली आणि पोलिसांकडून माहिती देखील घेतली. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. हा देखावा कशासाठी? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना विचारला आहे.
३ ऑक्टोबर रोजी पुण्याती बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केला होता. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. आरोपींनी पीडित तरुणीच्या मित्राला मारहाण करीत त्याचे कपडे काढले आणि त्याला झाडाला बांधले. तसेच तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांच्यासह बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार झालेल्या जागेची पाहणी केली. यावेळी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळेंच्या या पाहणीवरुन रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. झोपी गेलेल्याला जागं करता येतं,झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही असा टोला चाकणकरांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
"संबंधित घटना घडून पाच दिवस झाले,पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले,मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून १२ टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत.मग आपला हा देखावा कशासाठी? आपल्या माहितीसाठी,चंद्रपुरमध्ये कोरपना येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक कांग्रेसचा शहराध्यक्ष आहे,याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे ,पाठवणे,अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत ,पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता ,नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला,जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत,यांच्याविरोधात आंदोलन,पत्रकार परिषद कधी घेणार ? झोपी गेलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही," असे रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.