मुंबई - आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राम कदम यांना दम भरला. इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपा आमदार राम कदम यांनी स्त्रियांविषयी केलेल्या अशोभनीय वक्तव्याचा सुळेंकडून निषेध नोंदविण्यात आला.
सुप्रिया सुळे गुरुवारी इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावातील महिला आणि महिला सरपंचांशी संवादही साधला. पुरोगामी महाराष्ट्रात एक आमदार महिलांना आणि मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही. मात्र, संघर्षाची वेळ आल्यास हीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महिलांचा आत्मविश्वासही वाढवला. दरम्यान, दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वात राम कदम यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा आहेर लावून जोडे मारण्यात आले. यावेळीही सुप्रिया सुळेंनी उपस्थिती लावली. राम कदम यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारला आहे. याबाबत अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का ? जवाब दो, असेही सुळे यांनी म्हटले आहे.