Baramati Lok Sabha Result 2024 : सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या वाटणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठा विजय संपादन करत चौथ्यांदा विजय साधला. सुळे यांनी १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय मिळवित त्यांची भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा दणदणीत पराभव केला. यात ९१२ टपाली मतांचा समावेश आहे. केवळ एका फेरीचा आघाडीचा अपवाद वगळता सुळे यांनी सर्वच फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली. त्यात बारामती विधानसभा मतदारसंघात तब्बल ४८ हजार मतांची आघाडी मिळाली.
सुळे यांनी १७ व्या फेरीत १ लाखांची निर्णायकी आघाडी घेतली. याच फेरीत त्यांना खडकवासला मतदारसंघातही मताधिक्य मिळाले. १८ व्या फेरीत १० हजार ७३४ मतांची आघाडी घेत एकूण मताधिक्य १ लाख १९ हजार २२४ इतके झाले. २० व्या फेरीत १ लाख ३४ हजार २१४ तर २३ व्या फेरीत ही आघाडी दीड लाखाच्या पुढे गेली. या फेरीत सुळे यांना एकूण ७ लाख २४ हजार ९५५ मते मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७२ हजार ७४५ मते मिळाली. एकूण आघाडी १ लाख ५१ हजार ६२८ इतकी झाली. २४ व्या फेरीत केवळ खडकवासला मतदारसंघातील मतमोजणी शिल्लक होती. त्यात सुळे यांनी १ हजार ४२० मतांची आघाडी घेतली. सुळे यांना एकूण ७ लाख २८ हजार ६८ मते तर पवार यांना ५ लाख ७४ हजार ५३८ मते मिळाली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी एकूण १ लाख ५३ हजार ४८ मतांची आघाडी घेतली. त्यापूर्वी टपाली मतदानातून सुळे यांना ९१२ मते मिळाली. त्यामुळे सुळे यांचा १ लाख ५३ हजार ९६० मतांनी विजय झाला. पवार यांना ५८८ टपाली मते मिळाली.
ईव्हीएमवर पिपाणी; नाव दिलेले तुतारी
बारामती लोकसभा मतदारसंघात सोहेल खान यांना तुतारी हेच चिन्ह मिळाले होते, प्रत्यक्षात चित्रामध्ये ही बँड पथकातील पिपाणी होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने या चिन्हाला तुतारी असेच नाव दिले होते. त्यामुळे मतदारांचा संभ्रम झाला आणि हीच तुतारी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. सोहेल खान यांना एकूण ७ हजार ७९८ मते मिळाली तर चौथ्या क्रमांकावरील महेश भागवत यांना ५ हजार ९०६ मते मिळाली.
बारामतीच्या जय-पराजयाची कारणे काय?
सुप्रिया सुळेंचा विजय कशामुळे?
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रणनीती- सुनेत्रा पवार यांच्यासारखा नवखा विरोधी चेहरा- सुळे यांच्यासाठी पवार कुटुंबीयांनी दिलेली साथ- भाजप आणि मित्रपक्षांचा ओसरलेला प्रभाव
सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला?
- महायुतीची नवीन राजकीय समीकरणांबाबत नाराजी- भाजपचे फोडाफोडीचे राजकारण- नेत्यांच्या आवाहनाकडे सर्वसामान्यांनी केलेले दुर्लक्ष- शेतीच्या धोरणांबाबत असलेली नाराजी- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ८४ व्या वर्षी सोडलेली साथ