पुणे : राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांचे फोटो लावलेले पोस्टर मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले होते. त्यावर सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री होणार असल्याचा उल्लेख केला आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टरवरून जोरदार राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत. या पोस्टरवर सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवली आहे. मंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.
आज खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे. या देशात कोणालाही कोणाचेही पोस्टर लावता येणार नाही. हे पोस्टर अथवा त्याचा फोटो मी पाहिलेला नाही', असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
माझा फोटो विनापरवानगी वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का? असा प्रतिप्रश्न सुळे यांनी केला. पोस्टरबाबत पत्रकारांकडूनच यासंबंधी मला माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने, व्यक्तिने लावले आहे का याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे या आज बारामती लोकसभा मतदारसंघातील गाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
अजित पवारांच्या पोस्टरवर प्रतिक्रिया-
सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना अजित पवारांच्या पोस्टरवरही प्रतिक्रिया दिली. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरवर त्या बोलल्या. जयंत पाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझ्या आणि अजितदादांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे. दोन्ही पोस्टरवर पोस्टर लावणऱ्याचं नाव नाहीये. त्यामुळे हा आमच्या दोघांवर अन्याय आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करते की त्यांनी कारवाई करावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.