सांगवी (पुणे) : आताचे राजकारण कुठल्या पातळीवर चाललेय याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. सध्याचे राजकारण बिकाऊ असून येथे एका आमदाराची किंमत पन्नास खोके लावली गेली आहे आणि खोके घेणारे खोके घेतल्याचे नाही देखील म्हणत नाहीत. उलट तुम्हाला हे खोके हवेत का असे प्रति प्रश्न करतात. यामुळे आमदारांनी खोके घेतल्याचे सिद्ध होते. बंडखोरी करत शिंदे गट व भाजपने एकत्र येत बनविलेल्या सरकारवर, घराणेशाही व विविध विषयांवर ताशेरे ओढत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली.
सोमवारी (दि.२६) रोजी सांगवी (ता. बारामती) येथे गाव संपर्क दौऱ्यानिमत्त खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. सांगवी येथील तुकाई मंदिरात सुळे यांच्या हस्ते आरती घेऊन जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तर अचानक गणेश उत्सव मंडळाच्या सभागृहाचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प माघारी जायचं पाप शिंदे- फडणवीस सरकारचं आहे. यामुळे राज्यातील जवळपास दोन लाख नोकऱ्या गेल्या. मात्र, महाविकास आघाडीवर त्याच खापर फोडत असल्याची टीका सुळे यांनी केली.
घराणेशाही विरोधात भाजपने मिशन बारामती आखले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी सर्वस्व जबाबदारी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली आहे. सीतारामण यांनी बारामती दौरा सुरू केला असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. लोकसभेच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. यावर घराणेशाही बद्दल आपल्यावर होणारे आरोप सुळे यांनी खोडत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.