बारामती (पुणे) : नोएडा येथे बोलेरो गाडीच्या अपघातात बारामतीच्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी बारामतीत आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक मदत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे.
खासदार सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत योगी यांना ही विनंती केली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेत मरण पावलेल्या बोराडे, पवार आणि कुंभार कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या घटनेत कर्नाटकातील एक महिलाही मृत्युमुखी पडली असून गाडीचे चालक नारायण कोळेकर जखमी आहे. ते लवकर बरे होऊन घरी परतावे ही प्रार्थना. या घटनेत मरण पावलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे आणायचे आहे. तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ जी आपणास नम्र विनंती आहे की कृपया, आपण याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित यंत्रणेला आवश्यक ते आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी पोस्ट सुळे यांनी केली आहे.
बस आणि बोलेरो गाडीतून महाराष्ट्रातील एकूण ५० प्रवाशी निघाले होते. यापैकी बोलेरो गाडीत सात जण प्रवास करीत होेते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. यात एकूण पाचजणांचा मृत्यु झाला. बारामतीच्या चौघाजणांचा मृत्यू झाला.