पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालय मुंबई येथे मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव म्हणून मांढरे हे कार्यरत होते. तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयातील आपत्कालीन विभागासह महसूल विभागाचे संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी शासनाने अध्यादेशाद्वारे वरील आदेश दिले आहेत.सूरज मांढरे यांनी यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. तसेच ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असल्याने त्यांना येथील कामाचा अनुभव आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्या वर्षी देसाई यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर गेली १८ महिने त्यांनी विविध लक्षणीय कामे केली. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेत झीरो पेंडन्सीचा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली. पहिला टप्पा यशस्वीपणे राबविल्यानंतर आता त्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. तसेच शालेय मुलींवर होणाºया अत्याचाराला प्रतिकार करण्यासाठी मुलींना स्वरक्षण करण्याचे धडे देणाºया ‘स्मार्ट गर्ल’ या उपक्रमाची जिल्ह्यात नुकतीच सुरुवात केली आहे. त्यामुळे पावणेचार लाख मुली अन्याय, अत्याचाराविरोधात सक्षमपणे लढणार आहेत. त्याशिवाय जिल्हा हगणदारीमुक्तचा प्रयोग त्यांनी राबविला. मूल्यवर्धन अशा विविध योजना देसाई यांच्या काळात राबविण्यात आल्या. लवकरच ते मंत्रालयात कार्यभार स्वीकारणार आहेत.
सूरज मांढरे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 3:47 AM