पुणे : संशयास्पद प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनीपुणे रेल्वे स्टेशनवरून एका सुरतच्या व्यापार्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, ६ काडतुसे यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना मारण्यासाठी तो जात होता, असा संशय आहे. अनिलकुमार रामयग्य उपाध्याय (वय ४७, रा. सुरत, गुजरात) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार निशिकांत राऊत यांनी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, धीरेंद्र महाराज हे बुवाबाजी करून अंधश्रद्धा पसरत असल्याचे तसेच त्यांनी ते सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान श्याम मानव यांनी दिले होते. गेल्या ८ दिवसांपासून नागपूरमध्ये वाद सुरू आहे. श्याम मानव यांनी तशी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. त्यामुळे त्यांना धमक्याही आल्या होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलिस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून संशयास्पदरीत्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या कोटाच्या खिशात मेड इन इंग्लंडचे एक पिस्तूल व ६ काडतुसे आढळली. त्याच्या गळ्यात सोनसाखळी, त्यात सूर्याचे आकाराचे व सूर्याचे चित्र असलेले पेंडल सापडले. ब्रेसलेट, लॅपटॉप असा ३ लाख ५५ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. आपण कपड्याचे व्यापारी असल्याचा त्याने दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगत आहे. तो नागपूरला जात होता. श्याम मानव यांना ज्या धमक्या आल्या, त्याबाबत लोहमार्ग पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. दरम्यान, याबाबत लोहमार्ग पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करता, त्यांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.