पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली. शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, शहर पोलीस दलातील विशेष शाखेतील सहायक पोलीस फौजदार विजय भोसले आणि पाॅल अंथोनी राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी ठरले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील मूळचे सुरेंद्रनाथ देशमुख यांचे शिक्षण पुण्यात झाले असून ते १९८५ मध्ये पोलीस सेवेत भरती झाले. त्यांच्या आतापर्यंत मुंबई शहर, पुणे शहर, सांगली, पुणे ग्रामीण, औरंगाबाद शहर, नवी मुंबई या ठिकाणी नेमणुका झाल्या. मुंबईत नेमणुकीचा असताना सीएसटी स्थानकातून पळवून नेलेल्या ३ वर्षांच्या मुलीला उत्तराखंडातील हरिद्वार येथून आरोपीला ताब्यात घेऊन मुलीला सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देशात सर्वप्रथम सीसीटीव्हीचा वापर राष्ट्रीय पातळीवर केला होता. जानेवारी २००९ ते ऑक्टोबर २००९ या कालावधीत ट्रॉफीकाॅप हा पथदर्शी प्रकल्प पुण्यात यशस्वीपणे राबविला. त्याला डिसेंबर २०१० मध्ये भारत सरकारचा राष्ट्रीय स्तरावरचा ‘बेस्ट प्रॅक्टिस इन पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी’ हा बहुमान मिळविला. तसेच डिसेंबर २०११ मध्ये केंद्रीय नगरी विकास मंत्रालयातर्फे दिला जाणारा ‘न्यू इनिटेटिव्ह इन ट्रॉफिक इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट’ हा राष्ट्रीय पारितोषकाचा मान पटकाविला. नारायणगाव येथील हॉटेल कपिलाचे मालक चंद्रकांत खैरे यांचा खून केलेल्या प्रमुख आरोपींपैकी निसार शेख याला अटक केली होती. चंद्रकांत खैरे यांचा मृतदेह मुळा नदीतून शोधून काढला होता.
पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव हे मूळचे महाडमधील असून ते १९९० मध्ये राज्य राखीव पोलीस दल गट १ मध्ये भरती झाले. २००८ मध्ये बंगळुरू व २०१२ मध्ये मध्य प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये घातपात विरोधी तपासणी या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राला त्यांनी दोन वेळा पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात भाग घेणा-या महाराष्ट्र पोलीस संघास प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. लखनौ येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यात महाराष्ट्र संघास प्रथमच चॅम्पियनशिप ट्राॅफी मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
सहायक पोलीस फौजदार विजय भोसले हे १९८३ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. त्यांनी आतापर्यंत स्वारगेट, वाहतूक, खडक व गुन्हे शाखेत काम केले. आतापर्यंत ३४९ बक्षिसे मिळाली आहेत. त्यांना २०१० मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. २०१५ ते २०१९ या काळात ५५१ गुंडावर झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच विघातक व्यक्तीच्या कृत्यास आळा घालण्यासाठी त्यांनी प्रस्ताव तयार केले. पोलीस उपायुक्तांचे मदतनीस म्हणून या काळात ६० संघटीत गुन्हेगार टोळ्याविरुद्ध कारवाई करण्याकामी सिंहाचा वाटा घेतलेला आहे.
सहायक फौजदार पॉल अंथोनी हे जून १९८७ मध्ये पोलीस सेवेत भरती झाले आहेत. त्यांना आतापर्यंत ३१० बक्षिसे मिळाली आहेत. आपल्या ३४ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी पोलीस मुख्यालय, डेक्कन, विमानतळ, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात काम केले असून सध्या ते विशेष शाखेत कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा पॉल अंथोनी याही वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.